Tuesday, January 27, 2009

सत्यम्‌ घोटाळा

सत्यम्‌ घोटाळा :

वाग्युद्ध : गिलानी (आणि मं.) सरकार विरुद्ध सिंग (आणि मं.) सरकार

पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पाक शासनावतीने केलेल्या वक्तव्यांसंदर्भात चितारलेले हास्यचित्र.

Tuesday, September 04, 2007

आपणासी जे जे ठावे, ते ते दुसर्‍यांसी सांगावे...

काँप्युटरवर युनिकोड देवनागरी लिहिता यायला लागल्यापासून मला एक नवीनच छंद जडला - गूगलवरून देवनागरीत लिहिलेल्या स्ट्रिंग्ज्‌ शोधण्याचा. गूगलचं व्यसन तर आधीपासून होतंच; पण आधी देवनागरी फाँट्समध्ये प्रमाणीकरण नसल्याने अस्सल देशी विषयांशी संबंधित मजकूर इंतरनेटवर शोधणं जिकिरीचं असे. भारतीय भाषांमधलं इंतरनेटवरचं बरचसं लिखाण त्यांच्या-त्यांच्या साइटच्या फाँटमध्ये असायचं.. म्हणजे तो फाँट तुमच्याकडे नसेल तर तो लेख तुमच्याकरता मोहेंजोदारो-हडप्पा! काही ठिकाणी लोक देशी भाषा रोमन लिपीत लिप्यंतर (transliteration) करून लिहीत. तिथं तर काय.. आनंदीआनंदच! लोक रोमन लिपीत आपल्याला हवं तसं देशी शब्दाचं स्पेलिंग दणकून लिहीत असत! :-D म्हणजे 'वंदे मातरम्‌' या गाण्याशी संबंधित मजकूर/ पूर्ण गीतरचना मला हवी असेल तर vande mataram/ vande maataram/ wande mataram वगैरे सर्व पर्यायी स्पेलिंगचा शोध घ्यावा लागायचा.
पण युनिकोड देवनागरीमुळे याबाबतीत बरीच सोय झाली. 'वंदे मातरम्‌' चा गूगलवर शोध घेत असतानाच कधीतरी 'मराठी विकिपीडिया'च्या साइटवर जाऊन ठेपलो. उगाच इकडेतिकडे क्लिक करता करता वेगवेगळ्या विषयांची माहिती असलेले लेख, कॅटेगरीज्‌ पाहत भटकू लागलो. त्यावेळेला मराठी विकिपीडिया अगदीच छोटा होता.. माहिती असलेले लेख संख्येने कमी होते. शुद्धलेखन, मजकुराची मांडणी यातही 'सुधारणेला वाव आहे' अशी परिस्थिती होती. पण या मर्यादांपेक्षा मला मराठी विकिपीडियाची कल्पना आवडली. इंटरनेटवर आपल्या भाषेतला मुक्त विश्वकोश (free encyclopedia) ही कल्पना अगदी स्वागतार्ह होती!
मराठी भाषेत विश्वकोशाच्या, विविध विषयांवरील ज्ञानकोशांच्या परंपरा तशा बरीच दशके चालू आहेत. पण तरीही सर्वसामान्य मराठी घरांमध्ये मराठी भाषेत विश्वकोश असणे असा प्रसंग विरळाच (मुळात पुस्तकं घरी विकत आणून वाचणारी लोकसंख्या मर्यादित. त्यात छान, हलकंफुलकं, 'डोक्याला त्रास नाही' कॅटेगरीतलं ललित वाङ्मय वाचायचं सोडून असली 'जड' पुस्तकं कशाला वाचायला जावं?! :P). पण आता इंतरेनटमुळे असा आपल्या भाषेतला विश्वकोश सहजगत्या हाताशी मिळणं शक्य आहे हे पाहून छान वाटलं. कुणालाही आपापल्या परीनं, आपल्याला माहिती असलेल्या विषयांबद्दल भर घालता येणं हे या विश्वकोशाचं खरं बलस्थान! सबस्क्राइब केल्यावर मीही भर घालण्याचा प्रयत्न करू लागलो. सुरुवातीला मांडणी, लिहिण्याची पद्धत नीटशी कळली नव्हती.. पण नंतर तीही समजू लागली. गेल्या काही महिन्यात विकिपीडिया एक सवयीचा भाग बनून गेलाय. कामातून थोडीशी उसंत घेतली/ सुट्टीच्या दिवशी घरी ऑनलाइन आलो की एखादी चक्कर विकिपीडियावर ठरलेली! आताशा मराठी विकिपीडिया मराठी नेटिझन्सच्या उत्साही सहभागामुळे बाळसं धरू लागलाय. पण अजून करण्यासारखं प्रच्चंड काम बाकी आहे... 'इंग्लिश विकिपीडिया'वर फेरफटका मारल्यावर जाणवतं.
पण होईल.. मराठी विकिपीडियादेखील इंग्लिश विकिपीडियाप्रमाणे यशस्वी होईल. गरज आहे आपल्या - मराठी नेटिझन्सच्या - सहभागाची!

विडंबन: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

(मूळ गाणं: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे)

माझिया खांद्यावर पिशव्यांचे ओझे
पिशव्यांचे ओझेऽ

कशासाठी घरी होतो सुट्टी असून??
पाय गेले शॉपिंगसाठी पायपीट करून
थकतात गात्रे सारी उन्हात चालून
तरी नव्या दुकानी 'ही' शिरे उत्साहाने!
माझिया खांद्यावरऽ

ढीग कपड्यांचे पडती पुढ्यात येऊन
"टेक्स्चर- पॅटर्न" फंड्यांनी मी जातो गोंधळून
मुरडे 'ही' नाक परी ट्रायल घेऊन
तरी नवे स्टॉक दावी सेल्समन हासरे!
माझिया खांद्यावरऽ

अंती एक पीस निवडून होई घासाघिशी
तिकडच्या पाचशेवर इकडून निम्म्याची उतारी
"चारशे.. बरं; तीनशे तरी" त्याची मिनतवारी
हेका धरुनि आपुला स्वारी बाहेर पडे!
माझिया खांद्यावरऽ

हलगीवाला, ढोलकीवाला

बर्‍याच दिवसांनंतर इथे काहीतरी पोस्ट करतोय. लिहिण्यासारखे काही विषय अधूनमधून सुचायचे; पण गेल्या चार - पाच महिन्यांत प्रत्यक्ष पोस्ट करणं मात्र जमत नव्हतं. अखेर आज म्हटलं, लिखाण नाही तर चित्र तरी!

हलगीवाला
माध्यम : पेन
संदर्भ : प्रकाशचित्र (' तमाशा ' ; लेखन, प्रकाशचित्रण - संदेश भंडारे; लोकवाङ्मय गृह प्रकाशन)

ढोलकीवाला
माध्यम : पेन
संदर्भ : प्रकाशचित्र (' तमाशा ' ; लेखन, प्रकाशचित्रण - संदेश भंडारे; लोकवाङ्मय गृह प्रकाशन)श्रीगणेशावक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ।
निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥